Chapter 4.2: मोठे होत असलेल्या मुलांनो... Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 4: मोठे होत असलेल्या मुलांनो...

डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.

SOLUTION

डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. अनिल काकोडकरांचे हे व्यक्तिमत्त्व घडले ते त्यांच्या जीवनातील अनुभवांनी. कोणत्या अनुभवातून काय शिकावे याची उत्तम पारख त्यांना असल्याचे या पाठातून जाणवते. डॉ. अनिल काकोडकरांच्या मनात डॉ. होमी भाभांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला अजरामर स्थान असल्याचेही लक्षात येते. अशा मोठ्या व्यक्तींच्या विचारांचा आदर करणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर अंमल करणे यातून त्यांच्यातील आज्ञाधारकपणा, प्रामाणिकपणा दिसून येतो. डॉ. अनिल काकोडकर हे आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असलेले, जबाबदारीने काम पूर्ण करणारे, स्वप्रेरणेने अधिक कष्ट घेऊन काम करणारे, स्वत:चा मार्ग स्वत: शोधणारे असे व्यक्तिमत्त्व आहे. 'स्काय इज द लिमिट' या स्थितीचा अनुभव घेणारे, 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे कार्य करणारे, अनुभवाद्वारे शिक्षणावर विश्वास असणारे डॉ. अनिल काकोडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते.

 

टिपा लिहा.

बार्क

SOLUTION

'बार्क' हे 'भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर' म्हणजेच 'भाभा अणुसंशोधन केंद्र' या संस्थेच्या नावाचे लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक प्रचंड मोठी संस्था आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्ये इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

डॉ. होमी भाभा

SOLUTION

डॉ. होमी भाभा हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी 'भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर' या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करत असताना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. 'आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे' हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला.

'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

SOLUTION

लेखक 'भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर'च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम बार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थींना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना ’तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.“ असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच, एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. स्वत: जबाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले, की 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती निर्माण होते.

मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?

SOLUTION

मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली जात असे ते लोक कामाचे स्वरूप, त्यांमधील बारकावे हे काहीही न शिकता प्रथम आपल्या हाताखाली काम करण्यासाठी मदतनिसांची मागणी करत. काम सुरू होण्याआधीच साधनसामग्रीची मागणी केली जात असे. या वृत्तीमुळेच ते काम कधी झाले नाही. काम शिकून, समजून घेण्यात कोणालाच रस नसे. वरिष्ठांना ही गोष्ट न आवडल्याने या कामासाठी कोणाची नेमणूक झाली नाही. यामुळेच, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम झाले नसावे असे वाटते.

‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.

SOLUTION

परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती 'आधी केले मग सांगितले', या उक्तीप्रमाणेच काम करत राहतात. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रातील प्रत्येक बारीकसारीक काम ते स्वतः शिकून घेतात. त्यातील बारकावे जाणून घेतात. ते काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यासाठी लागणारा वेळ याबाबत त्यांना नेमकेपणाने माहिती असते. त्यामुळेच, ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. आपल्या वरिष्ठांना या कामातील सारे काही करता येते, हे माहीत असल्यामुळे हाताखालचे लोक त्यांना मान देतात. त्यांनी केलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करतात. अशाप्रकारे 'आधी केले मग सांगितले', या उक्तीची यथार्थता स्पष्ट होते.

‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.

SOLUTION

एखाद्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे आपल्याला त्या कामातील बारकावे लक्षात येतात. कामात एखादी चूक होत आहे हे लक्षात आल्यास ती दुरुस्त करता येते, हे मला प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. इयत्ता नववीत असताना आमच्या शाळेच्या वाङ्मय मंडळाने आमचे एक शिक्षक आणि आम्हां काही विद्यार्थ्यांवर शाळेच्या ग्रंथालयासाठी नवीन पुस्तके खरेदी करण्याची जबाबदारी सोपवली होती. आम्ही ग्रंथदानाच्या माध्यमातून लोकांकडून दान स्वरूपात पुस्तके मिळवली. प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्याशी इ-मेल, पत्रांद्वारे संपर्क साधून सवलतीच्या दरात पुस्तके देण्याची विनंती केली. झालेल्या खर्चाची व्यवस्थित नोंद ठेवली. पुस्तकांची खरेदी पूर्ण झाल्यावर सर्व पुस्तकांचे विषयांनुसार वर्गीकरण केले. संगणकाद्वारे त्यांची नोंदणी केली. अशाप्रकारे, या साऱ्या उपक्रमांतून आम्ही वेळेचे नियोजन, कामाचे व्यवस्थापन, हिशोब, पत्रलेखन अशा साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकलो. या सर्व गोष्टी स्वत: करता करता शिकल्यामुळे अतिशय चांगल्या समजल्या व लक्षातही राहिल्या.

कठीण शब्दांचे अर्थ (Difficult Words and Meanings):

  • अणुशास्त्रज्ञ (Anushastradnya) - Atomic scientist (अणूंचा अभ्यास करणारा वैज्ञानिक)
  • पद्मविभूषण (Padmavibhushan) - Second-highest civilian award in India (भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार)
  • व्यक्तिमत्त्व (Vyaktimatva) - Personality (व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आणि वागणूक)
  • पारख (Paarakh) - Discernment, ability to judge well (चांगली-वाईट ओळखण्याची क्षमता)
  • अजरामर (Ajaramar) - Immortal, eternal (कधीही न मरणारे, कायम टिकणारे)
  • अंमल करणे (Ammal Karne) - To implement, to act upon (आचरणात आणणे)
  • आज्ञाधारकपणा (Adnyadharakpana) - Obedience (आज्ञा पाळण्याची वृत्ती)
  • प्रामाणिकपणा (Pramaanikpana) - Honesty, integrity (इमानदारी)
  • निष्ठा (Nishtha) - Dedication, loyalty (एकाग्रता, श्रद्धा)
  • जबाबदारीने (Jababdarinay) - Responsibly (कर्तव्यनिष्ठेने)
  • स्वप्रेरणेने (Swapreranene) - By self-motivation (स्वतःच्या इच्छेने व उत्साहाने)
  • उक्ती (Ukti) - Saying, maxim (म्हण, सुविचार)
  • अणुसंशोधन (Anusanshodhan) - Atomic research (अणू संबंधित संशोधन)
  • लघुरूप (Laghurup) - Abbreviation, short form (संक्षिप्त रूप)
  • पाया घालणे (Paya Ghalne) - To lay the foundation (सुरुवात करणे, आधार स्थापित करणे)
  • मार्गदर्शन (Margadarshan) - Guidance (योग्य दिशा दाखवणे)
  • रुजू होणे (Ruju Hone) - To join ( कामावर दाखल होणे)
  • प्रख्यात (Prakhyat) - Famous, renowned (प्रसिद्ध)
  • स्फूर्ती (Sphurti) - Inspiration (प्रेरणा)
  • रुजवणे (Rujavane) - To instill, to implant (मनात ठसवणे)
  • प्रशिक्षणार्थी (Prashikshanarthi) - Trainee (प्रशिक्षण घेणारा)
  • तंतोतंत (Tantotant) - Exactly, precisely (अचूकपणे)
  • वरिष्ठ (Varishtha) - Senior (मोठ्या पदावरचा अधिकारी)
  • साधनसामग्री (Sadhansamugri) - Tools and materials (आवश्यक उपकरणे व साहित्य)
  • वृत्ती (Vritti) - Attitude, tendency (स्वभाव, प्रवृत्ती)
  • नेमणूक (Nemnuk) - Appointment (कामासाठी निवड)
  • यथार्थता (Yatharthata) - Appropriateness, validity (सार्थकता, खरेपणा)
  • परिपूर्णता (Paripurnata) - Perfection (दोषरहितता)
  • बारीकसारीक (Bariksarik) - Minute, detailed (लहान-सहान, तपशीलवार)
  • वाङ्मय मंडळ (Vangmay Mandal) - Literary association/club (साहित्यिक मंडळ)
  • ग्रंथालय (Granthalay) - Library (पुस्तकालय)
  • ग्रंथदान (Granthadaan) - Book donation (पुस्तके दान करणे)
  • प्रकाशक (Prakashak) - Publisher (पुस्तके छापून प्रसिद्ध करणारा)
  • पुस्तकविक्रेते (Pustakvikrete) - Booksellers (पुस्तके विकणारे)
  • सवलत (Savlat) - Discount, concession (किंमतीत सूट)
  • वर्गीकरण (Vargikaran) - Classification (गटांमध्ये विभागणी)
  • संगणक (Sangnak) - Computer (गणकयंत्र)
  • उपक्रम (Upakram) - Activity, initiative (कार्य, योजना)
  • नियोजन (Niyojan) - Planning (आखणी)
  • व्यवस्थापन (Vyavasthapan) - Management (कामाची सुव्यवस्था)