OMTEX AD 2

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Question Paper June 2025

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Question Paper June 2025

बोर्ड कृतिपत्रिका: जून 2025

मराठी युवकभारती

Time: 3 Hours Max. Marks: 80

कृतिपत्रिकेसाठी सूचना :

(१) आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात.

(२) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

HSC Marathi Board Paper June 2025
विभाग १ – गद्य [२०]
कृती १. (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८)
(१) आनंद अनुभवण्याची निमित्तं – (२)
(य) ........................
(र) ........................
(२) विधाने पूर्ण करा – (२)
(य) आई-वडील खंतावतात, जेव्हा ........................
(र) आपण आनंदाला पारखे होतो, जेव्हा ........................
पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो, तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर कितीही पैसे मिळाले, तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या, अधिक पैशाच्या पाठी धावत राहातो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो.
यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणीत होतो. २ × २ = ४ असा आनंदाचा गुणाकार होतो; पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं, तरी गुणाकार शून्यच येणार.
यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद.
एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे; पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला, की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.
आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्त्व आहे - ज्यात तुम्हांला खरा आनंद होतो, तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई-वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई-वडिलांच्या आनंदासाठी हे केलं; पण जेव्हा आई-वडिलांना जाणवतं, की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच.
(३) स्वमत अभिव्यक्ती – (४)
'एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे,' या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
किंवा
खरा टिकाऊ आनंद मिळविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८)
(१) लेखकाच्या मते व्यंगचित्राच्या भाषेची वैशिष्ट्ये – (२)
(य) ........................
(र) ........................
(२) फरक लिहा : (२)
(य) आईचं नातं ........................
(र) बाकीची नाती ........................
व्यंगचित्रं ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते.’ हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसांबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणभरही आई पार आकाशात गेलीये. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेने ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही.
(३) स्वमत अभिव्यक्ती – (४)
'आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही.' या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
'व्यंगचित्रांचे प्रभावीपण' तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

(इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४)
(१) आकाशाचे कोणतेही दोन गुण लिहा. (२)
(य) ........................
(र) ........................
आकाश अलिप्त आहे, निःसंग आहे तसेच मोकळे आहे. ते आपले पंख मिटत नाही. जणू अधिकच पसरते. आकाशाप्रमाणे मोकळे असावे. आत, गाठीचे काही नाही. लपवालपव नाही. छपवा छपव नाही. निःस्वार्थ मनुष्यच हे करू शकतो. कारण त्याला इतरांना बगळून काही मिळवायचे नसते. मोकळेपणा हवा असेल तर अधिकाधिक निःसंग, निःस्वार्थ व्हायला हवे. आकाशाजवळ काही नाही. ते केरकचरा, धूळ-धुरोळा जवळ ठेवीत नाही; त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, ताऱ्यांनाही जवळ घेत नाही. धूळ नको, हिरे-माणकेही नकोत. अशी वृत्ती झाली म्हणजे मोकळेपणा येतो. मग सारे मित्र. सर्वांना जवळ घेता येते. आकाशाला आपपर नाही. गरुडाने भरारी मारावी, चिमणीने भुरभुर करावी. सजल मेघाने लोंबावे, निर्जल मेघाने गर्जावे. सर्वांना प्रवेश सर्वांना परवानगी, सर्वांना जवळ घ्यायला अनंत हात सदैव सिद्धच आहेत !
आकाशाप्रमाणे मोकळे, व्यापक, निःसंग व्हावे असे मला वाटते.
(२) निःस्वार्थ मनुष्यच आकाशाप्रमाणे असू शकतो. (२)
कारण ........................
विभाग २ – पद्य [१६]
कृती २. (अ) खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८)
(१) समुद्राची संचार स्थाने – (२)
(य) ........................
(र) ........................
(२) समुद्राने केलेल्या दोन मानवी क्रिया – (२)
(य) ........................
(र) ........................
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंझारलेली दाढी, झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरू लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंमसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील.
(३) अभिव्यक्ती : (४)
'समुद्र कोंडून पडलाय' या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

(आ) खालील ओळींचा अर्थ लिहा : (४)
'रडू नकोस खुळे, ऊठ ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले'

(इ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (४)
काव्य सौंदर्य :
कणस भरू दे जिवस दुधानं
देठ फुलांचा अरळ मधानं
कंठ खगांचा मधु गानानं
आणीत शहरा तुणपर्णा
वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
किंवा
रसग्रहण :
फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई
तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
विभाग ३ – साहित्यप्रकार : कथा [१०]
कृती ३. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४)
(अ) (१) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(य) अधिकाधिक लोकांना आकर्षित करणारी कथाकथनाची लोकप्रिय माध्यमे लिहा. (१)
(र) कथावाचनाला इतर कलांची जोड दिल्यास श्रोत्यांवर होणारा परिणाम लिहा. (१)
कथेचे 'सादरीकरण' ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकटवाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते.
अलीकडच्या काळात 'कथाकथन' क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा - अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे 'कथाकथन' अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर कथा - सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.
अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते.
(२) कथाकथनाचे तंत्र अवगत करून घेण्यासाठी आवश्यक असणारे घटक लिहा. (२)

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (६)
(य) 'शोध' कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
(र) 'गढी' या कथेतील गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.
(ल) 'नर्स ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करायची धडपड करते,' या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(व) 'गढी' कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.
विभाग ४ – उपयोजित मराठी [१४]
कृती ४.(अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (४)
(१) मुलाखतीचे स्वरूप थोडक्यात लिहा.
(२) माहितीपत्रकाच्या रचनेची दोन वैशिष्ट्ये सांगा.
(३) अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी स्पष्ट करा.
(४) वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (१०)
(१) खालील मुद्द्यांच्या आधारे 'मुलाखतीची पूर्वतयारी' या विषयी लिहा :
मुलाखत म्हणजे .......... मुलाखतीचा पाया .......... ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांच्या बद्दलची माहिती .......... मुलाखतीचे उद्दिष्ट .......... मुलाखतीचे माध्यम.
(२) खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा :
माहितीला प्राधान्य .......... उपयुक्तता .......... इतरांपेक्षा वेगळेपण .......... आकर्षक मांडणी .......... भाषाशैली.
(३) खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा :
अहवालाचे स्वरूप .......... अहवालाचा प्रारंभ .......... अहवालाचा मध्य .......... अहवालाचा शेवट .......... अहवालाची भाषा.
(४) खालील मुद्द्यांच्या आधारे 'बातमीवर आधारित वृत्तलेख' सोदाहरण स्पष्ट करा :
घटनाधारित लेख .......... संदर्भांची माहिती .......... मुद्द्यांचे विश्लेषण .......... तज्ज्ञांचे सहकार्य .......... विषयाला मर्यादा नाही.
विभाग ५ – व्याकरण व लेखन [२०]
कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१०)
(१) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात ?
या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा :
(१) माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात.
(२) माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात.
(३) माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात.
(४) माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत.
(र) सूचनेप्रमाणे सोडवा : (१)
परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता.
(होकारार्थी करा.)
(२) (य) योग्य पर्याय निवडा. (१)
'नवरात्र' या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.
(१) विभक्ती तत्पुरुष समास
(२) कर्मधारय समास
(३) समाहार द्वंद्व समास
(४) द्विगु समास
(र) 'यथोचित' या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. (१)
(३) (य) योग्य पर्याय निवडा. (१)
'मी खिडकी हलकेच उघडतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा :
(१) भावे प्रयोग      (२) कर्मणी प्रयोग
(३) कर्तरी प्रयोग      (४) यांपैकी नाही.
(र) 'भावे प्रयोग' असलेले वाक्य शोधून लिहा : (१)
(१) सगळे खूष होतात.
(२) आरशातल्या स्त्रीने मला विचारले.
(३) हा संदेश मला पोहचवता आला.
(४) मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.
(४) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
'आहे ताजमहाल एक जगती
तो तोच त्याच्यापरी'
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
(१) अर्थान्तरन्यास      (२) अतिशयोक्ती
(३) अनन्वय              (४) अपन्हुती
(र) 'न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील ।'
या पदयपंक्तीतील उपमेय ओळखा : (१)
(५) (य) 'गळा कापणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा : (१)
(१) गळा तोडणे
(२) गळ्याशी येणे
(३) विश्वासघात करणे
(४) यांपैकी नाही
(र) 'गळा कापणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. (१)

(आ) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा : (१०)
(१) संगणक साक्षरता : काळाची गरज
(२) शेतकऱ्याचे मनोगत
(३) परीक्षा नसत्या तर .........
(४) माझा आवडता साहित्यिक
(५) मी पाहिलेला अपघात

OMTEX CLASSES AD