Advertisement

Chapter 8.2: जाता अस्ताला Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 8: जाता अस्ताला



तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.


SOLUTION

या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखाद्या घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वत:हून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम्र; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे, तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.


पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.


SOLUTION

आपल्या अस्तानंतर अंधकारमय होणाऱ्या पृथ्वीच्या काळजीने सूर्य चिंतित झाला आहे. पृथ्वी अंधारात बुडून जाऊ नये, म्हणून तो या सृष्टीतील घटकांना पृथ्वीला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो; मात्र कोणीही त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही. त्याचवेळी लहानशी पणती मोठ्या धैर्याने सूर्याचे कार्य जमेल तितके करण्याची जबाबदारी उचलते. सूर्याइतका प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकत नाही याची तिला पूर्णपणे कल्पना आहे. तरीही ती आपल्या प्रकाशाने शक्य तेवढा अंधार दूर करण्याची तयारी दर्शवते. सूर्याला मदत करण्याची उदात्त भावना या पणतीमध्ये दिसून येते. एखादे कार्य हाती घेताना प्रामाणिकपणा व दृढ इच्छाशक्ती कामी येते. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये आंतरिक शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून जग सुंदर बनवण्याची इच्छा बाळगणे गरजेचे आहे, हा विचार पणतीसारख्या छोट्या प्रतीकाच्या माध्यमातून येथे व्यक्त झालेला आहे.



सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा.


SOLUTION

सूर्य अस्ताला जाऊ लागला, की कवीमन कविता करू लागते, तर चित्रकाराचा कुंचला अलगद रंगांची उधळण करू लागतो. सूर्यास्ताच्या वेळेचे निसर्गाचे ते रमणीय दृश्य पाहताना मन विचारांनी, आठवणींनी भरून येते. सूर्यास्तासमयी आकाशात दिसणारे रंग डोळ्यांना सुखावणारे असतात.

सूर्योदय – सूर्यास्त जणू मनुष्याच्या जन्म-मृत्यूचे प्रतीक आहेत. मनुष्याचा जन्म म्हणजे सूर्योदय, ऐन तारुण्याचा काळ म्हणजे दिवस आणि म्हातारपण (वार्धक्य) म्हणजे जणू आयुष्याची संध्याकाळ होय. सूर्यास्ताची वेळ मनाला शांतता व समाधानाचा अनुभव देत असते. असा अनुभव माणसाला त्याच्या उतारवयात येत असतो. ऐन तारुण्याचा, उमेदीचा काळ चांगल्या मार्गाने जगल्यास आयुष्याचा शेवटही शांत, समाधानकारक होतो, हेच जणू हा सूर्यास्त आपल्याला सांगत असतो.

दिवसभर कष्ट करणार्या कष्टकऱ्यांसाठी सूर्यास्त विश्रांती घेऊन येतो. आजचा दिवस संपल्याची जाणीव करून देणारा हा क्षण मनात नव्या दिवसाची ओढही जागवतो. गेलेला दिवस भूतकाळात जमा होणार असतो व येणारा दिवस उज्ज्वल भविष्यकाळ घेऊन येत असतो. काहीवेळा अपूर्ण राहिलेले पूर्ण करण्याची आशा मनात निर्माण करून, तर काही वेळा पूर्ण केलेल्या कामांचे समाधान चेहऱ्यावर उमटवून सूर्यास्त आपले विविध रंग आकाशात उधळत असतो. देवळात होणारा घंटानाद, आरतीचे सूर, देव्हाऱ्यातील दिव्याचा मंद प्रकाश सूर्यास्ताचे साैंदर्य वाढवतात. सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येकाच्या मनात असलेल्या श्रद्धास्थानाप्रती हात जोडले जातात.


कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.


SOLUTION

कवी रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गातील प्रकाशमान सूर्य आणि मिणमिणता प्रकाश देणारी पणती यांच्या माध्यमातून सजीवसृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये जगाला सुंदर करण्याची क्षमता असते, असा संदेश दिला आहे. 

सूर्यास्तानंतर ही संपूर्ण पृथ्वी अंधकारमय होणार आहे. विश्वाच्या काळजीने सूर्य सर्वांना विनंती करतो, की पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा; पण त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही कारण सूर्यासमान क्षमता, सामर्थ्य आपल्यात नाही असे सर्वांना वाटते. अशावेळी पणती पुढे येते, मोठ्या नम्रतेने ती पृथ्वीला सांभाळण्याची जबाबदारी उचलते. भले ती सूर्याइतका प्रकाश पृथ्वीला देऊ शकणार नाही; मात्र पृथ्वीला अंधकारमय होऊ देणार नाही अशी जिद्द मनात ती बाळगते. तिची आंतरिक इच्छाशक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या आधारेच ती मोठी जबाबदारी उचलते. सूर्यालाही पणतीवर विश्वास आहे. पणतीचे धैर्य अन् नम्र भाव सूर्याला चिंतामुक्त करतो.

आपल्याही आसपास अशा सामर्थ्यशाली व्यक्ती असतात, ज्यांना मदतीची गरज असते. त्यावेळी आपण आपल्या परीने शक्य ती मदत त्यांना करावी. एखाद्या कार्यात आपला खारीचा का होईना, वाटा उचलावा. प्रत्येकामध्ये क्षमता असते; केवळ आपल्यातील क्षमतेला योग्य कार्यात वापरण्याचे ज्ञान, विश्वास व सकारात्मकता आपल्यात असली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या आत लपलेल्या गुणांना जाणून घेणार नाही तोपर्यंत ते कधीच इतरांसमोर येणार नाहीत. या सुप्तगुणांना वाट मोकळी करून द्यावी, कोणालाही कमी लेखू नये कारण या जीवसृष्टीत प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे अन् प्रत्येक वस्तू आपल्या क्षमतेनुसार जग सुंदर करत असते, असा अर्थ या प्रतीकांतून व्यक्त होतो.



सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.



SOLUTION

सूर्य:

(उदास) अहो, कोणी ऐकतंय का? माझी अस्ताची वेळ झाली आहे. मी अस्ताला गेल्यानंतर या धरतीचे कसे होईल? कोणी येईल का माझ्या मदतीला? या पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा हो!

पणती:

हे महान सूर्या! मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.

सूर्य:

बोल... पणती!

पणती:

(नम्रतेने) मी तुझी चिंता दूर करू इच्छिते. मला माहीत आहे, मी तुझ्याइतकी सामर्थ्यवान नाही; पण मला जमेल तसा पृथ्वीवरील अंधकार दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

सूर्य:

(आनंदाने) खरंच पणती, तू वाचवशील या पृथ्वीला? तू करशील मला मदत?

पणती:

हो! आनंदाने.

सूर्य:

तू लहान आहेस; परंतु तुझी जिद्द मोठी आहे. तुझे हे बोल ऐकून माझ्या मनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पणती:

सूर्यदेवा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी नक्कीच तुझा विश्वास सार्थ ठरवेन.

सूर्य:

माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच या धरतीला प्रकाशित करशील. आता मी निश्चिंत मनाने अस्ताला जातो.

पणती:

धन्यवाद भास्करा! तू मला माझी क्षमता दाखवण्याची संधी दिलीस.